बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ; कुत्र्याचा अन् घोड्याचा फडशा पाडला

पारनेर  – पारनेर तालुक्यात बिबट्याने मागील अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. पारनेर शहरालगत तिरकळमळा वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू झाला होता. तसेच याच परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला करत कुत्र्याचा फडशा पाडला.

तसेच तालुक्यातील चोंभूत येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळाच्या घोड्याचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील अनेक भागांत बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढला असतानाही पारनेरच्या वनविभागाच्या अधिकार्‍यांचे या घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील चारंगबाबा मंदिराजवळ मंगळवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास मेंढपाळ दैनू बरकडे यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला चढवून तिला ठार केले. कुत्र्यांचा आवाज आल्याने बरकडे यांना जाग आली असता, हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. चोंभूत, शिरापूर परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून, ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात पिंजरा लावण्याबाबत मागणी होत आहे.

तसेच पारनेर येथील तिरकळ मळ्यात गेल्याच आठवड्यात शेतकर्‍याच्या शेळ्यांवर बिबट्यांने हल्ला केला. यामध्ये तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. पुन्हा याच परिसरात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. त्यात कुत्र्याचा मृत्यू झाला. या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्याने पाळीव प्राण्यावर हल्ले केले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र तालुक्यातील वन अधिकार्‍यांना बिबट्या अद्याप दिसलेला नाही. अनेक ठिकाणी या अधिकार्‍यांनी पिंजरे लावले आहेत. मात्र त्यामध्ये एकही बिबट्या जेरबंद झाला नाही. त्यामुळे हे पिंजरे कशासाठी लावले आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

अधिकार्‍याच्या मुजोरीने कर्मचारी हैरान
पारनेरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हेकेखोर व मुजोरपणामुळे नागरिकांबरोबरच वन खात्यातील काही प्रामाणिक काम करणार्‍या अधिकार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यामुळे या अधिकार्‍यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.