बगलबच्च्यांच्या हप्तेखोरीला लोक कंटाळले

महेश लांडगे यांचा पराभव करणारच : विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची भिष्म प्रतिज्ञा

चितपट करूनच दाखवू

गतवेळी विलास लांडे यांचा पराभव करण्याची आपण प्रतिज्ञा केली होती आणि त्यांचा पराभव करून दाखविला. चिखलीसह भोसरीतील अनेक मतदारांनी दिलेल्या पाठबळावर गतवेळी लांडगे यांना आम्ही विजयी केले होते. यावेळी त्यांना “चितपट’ करूनच दाखवू, असेही साने यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीकडून आपण लढून लांडगे यांचा पराभव करणार का? या प्रश्‍नावर त्यांनी उमेदवार कोणीही असो, त्यांचा पराभव नक्की करून दाखवू. आपण भोसरीतून लढण्यास इच्छुक असलो तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी ताकद देऊन लांडगे यांचा पराभव निश्‍चितपणे करू, असा विश्‍वास साने यांनी यावेळी बोलून दाखविला.

पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघात गतवेळी आम्हाला बदल अपेक्षित होता. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्‍न सुटेल म्हणून महेश लांडगे यांचे काम केले. मात्र आमच्यासह मतदार संघातील नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांच्या बगलबच्चांच्या हप्तेखोरीला लोक कंटाळले असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यांचा पराभव करेपर्यंत स्वस्थ बसणार नसून जोपर्यंत पराभव करणार नाही तोपर्यंत डोक्‍यावरची “शेंडी’ काढणार नाही, अशी भिष्म प्रतिज्ञा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर विरोधी पक्षनेते यांनी पत्रकारांसमोर आज भाष्य केले. ते म्हणाले, भोसरी विधानसभा मतदारसंघात तरुण नेतृत्त्व आल्यास त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सुटतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे गतवेळी माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी महेश लांडगे यांना ताकद देऊन निवडून आणले. मतदार संघाच्या विकासापेक्षा गेल्या पाच वर्षांत वेगळेच चित्र निर्माण झाले. भाजपाची महापालिकेत सत्ता आल्यानंतर परिस्थिती आणखीनच वाईट झाली.

भोसरीच्या आमदारांच्या जाचाला मतदार संघातील लोकांसह उद्योजक व बांधकाम व्यवसायिक कंटाळले आहेत. जुगाराच्या अड्ड्यांना मिळणारे पाठबळ, टपरीधारकांवरील अन्याय, बगलबच्च्यांनी चालविलेली हप्तेखोरी यामुळे मतदारसंघातील वातावरण अत्यंत दुर्देवी बनले आहे. महापालिकेतही असाच प्रकार सुरू असून ठेकेदारांची रिंग आणि त्यातून होणाऱ्या भ्रष्टाचाराने उच्छाद मांडला आहे. जे प्रश्‍न सुटतील म्हणून पाठींबा दिला ते प्रश्‍न आजही कायम आहेत.

मोशीतील कचरा डेपा हा ज्वलंत विषय देखील ते सोडवू शकले नसून शास्तीकर व अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे भोसरीच्या जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नवा आमदार होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार कसल्याही परिस्थितीत या मतदार संघातून विजयी होईल, असा विश्‍वास व्यक्त करताना आपण लांडगे यांचा पराभव करेपर्यंत “शेंडी’ काढणार नसल्याचेही साने म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.