महामार्गालगत थांबणाऱ्या वाहनांना दंड

संग्रहित छायाचित्र

पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा परिसरात वाहतूक शाखेची कारवाई

थेऊर – पुणे-सोलापूर महामार्ग व लगतच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या 17 वाहनांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस पथकाने थेऊर फाटा परिसरात दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.

दोन शहरांदरम्यानचे अंतर कमी होण्यासाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांचा प्रवासाचा कालावधी कमी झाला. परंतु काही कालावधीनंतर मार्गावर अपघाताच्या घटनांत वाढ होऊ लागली. यातील अनेक कारणांपैकी मार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अपघातांच्या घटना घडू लागल्या. यामध्ये वाहनात बिघाड झाल्यास, चालकांना विश्रांतीची गरज असल्यास मार्गावरच वाहन उभे करणे, लघुशंका करण्यासाठी वाहन थांबविणे आदी कारणांसाठी हलकी व अवजड वाहने उभी केली जातात.

ही थांबलेली वाहने वेगात येणाऱ्या वाहन चालकाच्या लक्षात न आल्याने भरधाव वाहन मार्गावरील उभ्या वाहनांना पाठीमागून जोरात धडकून भीषण अपघात होतात. महामार्गावर सूचना फलक लावलेले असूनही, त्याकडे दुर्लक्ष करून द्रुतगती मार्गालगत वाहने उभी केली जातात. थांबणाऱ्या वाहनांवर कारवाई करणाऱ्यासाठी महामार्ग पोलीस यंत्रणा आहे. परंतू त्यांच्याकडून कारवाई होत नाही. त्यामुळे अपघातांच्या घटना द्रुतगती मार्गावर वारंवार घडत आहेत.
अपघातात मृतांची संख्या जास्त असते.

अपघात रोखण्यासाठी वाहतूक सुरक्षा यंत्रणांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. दिवसभरात थेऊर फाटा व फाटा ते थेऊर केसनंदमार्गे पुणे-नगर महामार्गावर जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या 17 वाहनांवर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप देवकर, संतोष शिंदे, वॉर्डन सागर बरकडे यांनी कारवाई केली. त्यामुळे वाहनचालकांची पळापळ झाली.

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी पेट्रोलिंग करून मार्गावर उभ्या केलेल्या वाहन चालकांवर “नो पार्किंग’बाबत दंडात्मक कारवाई करतात. परंतू ते निघून गेल्यावर कोणी वाहन उभे केल्यास कारवाई करता येत नाही. त्यातच मनुष्यबळ कमी असल्याने ठिकठिकाणी कर्मचारी उभे करणे शक्‍य होत नाही.
– सूरज बंडगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)