शहरात गुलाबी थंडीचा अनुभव

तापमानात होतेयं घसरण : पुढील काही दिवसांत वाढणार कडाका

पिंपरी – दिवाळी संपली तरी सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे यावर्षी थंडीचे आगमत लांबले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून घसरत असलेल्या पाऱ्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव शहरवासियांना मिळत आहे. आगामी काही दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून व्यक्‍त होत आहे.

अवकाळी पाऊस थांबल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराच्या किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत आहे. मागच्या मंगळवारी म्हणजे दि. 5 नोव्हेंबर रोजी शहराचे किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर आठवडाभरातच आता तापमानामध्ये 4 अंश सेल्सिअसने घट झालेली पहायला मिळत आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही काही दिवस तापमानामध्ये घट झाली होती. 16 ऑक्‍टोबर रोजी शहराचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यामुळे, दिवाळीमध्ये कडाक्‍याच्या थंडीला सामोरे जावे लागेल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ऐन दिवाळीच्या कालावधीमध्ये वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला तोंड देण्याची वेळ आली. वातावरणातील या बदलामुळे थंडी गायब झाली आणि तापमानात काहीशी वाढ झाली. त्यानंतर गुरुवारपर्यंत शहरातील किमान तापमानाचा पारा हा 20 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यानच राहिला.

मागील गुरुवारपासून सायंकाळी वातावरणात गारवा वाढला आहे. गुरुवारी शहरात किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी किमान तापमना 17 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी सर्वात कमी म्हणजे 16 अंश सेल्सिअस तापमनाची नोंद झाली.

कपड्यांची दुकाने सजली
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागामध्ये स्वेटरसह ऊबदार कपड्यांची दुकाने सजली आहेत. थंडीची चाहूल लागल्याने सध्या या दुकानावर कपडे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसत आहे. पिंपरी कॅम्प मधील अनेक व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची ऊबदार कपडे मागवल्याने ही कपडे सध्या सर्वांचे आकर्षण ठरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.