कोणत्याही परवानग्या घेतल्या नाहीत : तहसीलदारांनी दिले खुलासा करण्याचे आदेश
…अन्यथा भांडगावातील जमिनी सरकारी जमा करणार
यवत – दौंड तालुक्यातील भांडगाव येथे बेकायदा शासनाच्या कसल्याही परवानग्या न घेता गुंठेवारी करणाऱ्यांना दौंडच्या तहसीलदारांनी दणका दिला असून शर्त भंग केले प्रकरणी जमीन सरकार जमा का करणेत येवू नये याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करावा, अन्यथा जमीन सरकार जमा करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे.
भांडगाव येथील गट नं.363 ही अरविंद गुलाबचंद सोलंकी यांच्या नावे असून या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता बेकायदा प्लॉटिंग करून त्याची जाहिरात करून विक्री करीत आहे. या जमिनीमध्ये मोठ्या उंचीची कमान व इतर स्वरूपाचे बांधकाम केलेले आहे. त्याचप्रमाणे उत्तरेस रस्ता ठेवलेला असून रस्त्याचे पशिमेस छोट्या मोठ्या आकाराचे प्लॉट पाडून विक्री करण्याची जाहिरात करीत आहे.
गटाच्या चारही बाजूंनी तारेचे संरक्षक कुंपण काही जागेत भिंतीचे बांधकाम, गटात बनविलेल्या प्लॉटिंगसाठी रस्त्याचे कच्चा मुरूम टाकून बांधकाम केल्याचे दिसून आले असल्याचे भांडगावचे तलाठी अर्जुन स्वामी यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पंचनामा करून तहसीलदारांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.
संबंधित प्लॉटिंग धारकांस नोटीस बजावली असून त्यांचेजवळील कागदपत्राची तपासणी करून पुढील कारवाई करू. इतर ठिकाणच्या प्लॉटिंग संदर्भात तक्रारी आल्यास कारवाई करू.
– संजय पाटील, तहसीलदार, दौंड
अकृषिकची परवानगी घेतली नाही
प्लॉटिंग करताना अकृषिक वापराची परवानगी घेणे अपेक्षित असताना अकृषिक परवानगी घेतली असल्याचे दिसून येत नाही यात शर्तभंग केला असल्याचे दिसून येत आहे. दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये कसल्याही कायदेशीर नियमांची पूर्तता न करता सर्वसामान्य नागरिकांना बेकायदा गुंठेवारीतील जमिनींची विक्री केली जात आहे. माळरानावरील ओसाड जमिनी कवडीमोल दराने विकत घेत लाखो रुपयांची कमाई संबंधित विकासक कमावत आहेत.
कागदी घोडे रंगवून आर्थिक…
बेकायदा प्लॉटिंगच्या जागेत भविष्यात पीएमआरडीएने कारवाई केल्यास अशा बेकायदा गुंठेवारीत जमिनी खरेदारांचे आर्थिक नुकसान होऊ शकते; मात्र बेकायदा प्लॉटिंग विकसक मात्र बिनधास्त होते, आमचे काही चुकीचे काम नाही अशा फुशारक्या मारल्या जात होत्या; मात्र आता तहसीलदारांनी या जमीन सरकार जमा करण्याची नोटीस बजावल्या आहे, आता नोटीस आल्यावर कारवाई होते का कागदी रंगवून आर्थिक सेटिंग होते, अशी चर्चा परिसरात आहे.
अनधिकृतचा सुळसुळाट
सध्या दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग सुरु असून दौंडचे तहसीलदार इतर प्लॉटिंग व्यवसायिकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.