शांतताप्रिय भारत आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम- राष्ट्रपती

राष्ट्रपती कोविंद यांचा चीनला स्पष्ट संदेश

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी सीमेवरील तणावाला जबाबदार असणाऱ्या चीनला स्पष्ट शब्दांत संदेश दिला. भारताला शांतता हवी आहे. मात्र, शांतताप्रिय भारत आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे, असे त्यांनी नामोल्लेख टाळून चीनला निक्षून सांगितले.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला उद्देशून भाषण केले. त्यावेळी त्यांनी कुरापतखोर चीनला कठोर भाषेत सुनावले. करोना फैलावाने मानवतेपुढे प्रचंड आव्हान उभे केले आहे. त्याविरोधात जागतिक समुदायाने एकवटून लढा देण्याची गरज असताना आमच्या शेजाऱ्याने (चीन) विस्तारवादी हेतूने दु:साहस केले, असे त्यांनी म्हटले. चीनच्या कुरापतींमुळे काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. त्यावेळी भारतीय सीमेच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांना राष्ट्रपतींनी अभिवादन केले.

करोनाविरोधी लढ्यासाठी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची प्रशंसा केली. महाकाय आव्हान वेळीच ओळखून सरकारने योग्य वेळेत प्रभावी पाऊले उचलली. असामान्य मानवी प्रयत्नांतून करोना संकटाचा मुकाबला केला जात आहे. त्या प्रयत्नांमुळे जागतिक साथीची तीव्रता कमी करण्यात यश आले. संपूर्ण जगासमोर त्यातून अनुकरणीय उदाहरण उभे राहिले आहे. डॉक्‍टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल देश ऋणी आहे. करोना योद्धे बनून ते लढ्यात अग्रभागी आहेत, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. भारताच्या स्वावलंबनाचा अर्थ स्वत:ला सक्षम करणे असा आहे. जगापासून स्वत:ला दूर करणे असा त्याचा अर्थ नाही. जागतिक बाजार व्यवस्थेत सहभागी होऊन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे हा भारताचा उद्देश आहे, असे म्हणत त्यांनी परकी गुंतवणूकदारांची साशंकता दूर करण्याचा प्रयत्न केला.

अयोध्येतील राम मंदिराची उभारणी ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. राम जन्मभूमीच्या मुद्‌द्‌यावर न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून तोडगा निघाला. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांनी आदरपूर्वक स्वीकारला. त्यातून शांतता, अहिंसा, प्रेम आणि सलोखा या भारतीय मुल्यांचे दर्शन संपूर्ण जगाला घडले, अशी भावनाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.