स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सैन्य दल “आत्मनिर्भर’

पोर्टल लॉंच करत सरकारची ठोस पावले

नवी दिल्ली: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी “आत्मनिर्भर आठवड्या’दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला “अपॉर्च्युनिटी फॉर मेक इन इंडिया डिफेन्स’चे पोर्टल लॉंच केले. यावेळी आत्मनिर्भर भारतअंतर्गत भारतीय कंपन्यांनी तयार केलेली 15 संरक्षण सामग्रीदेखील लॉंच करण्यात आली. इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा संरक्षण क्षेत्रात अधिक आत्मनिर्भर होणे आवश्‍यक असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केले.

राजनाथ सिंह यांनी लॉंच केलेल्या संरक्षण सामग्रीत ऑर्डनंस फॅक्‍टरीद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या नाग मिसाईल कॅरिअरच्या प्रोटोटाईपचा समावेश आहे. याची निर्मिती डीआरडीएल हैदराबादसोबत करण्यात आली आहे. नाग मिसाईल कॅरिअर तयार झाल्यानंतर भारताला अन्य देशांकडून मिसाईल कॅरिअर खरेदी करण्याची गरज भासणार नाही.

तसेच 260 कोटी रुपये ते 3 हजार कोटी रुपयांपर्यंतची आयात कमी होणार आहे. याव्यतिरिक्त आर्डनंस फॅक्‍टरीद्वारे तयार करण्यात आलेली 14.5 एमएम अँटी मटेरियल रायफलदेखील लॉंच करण्यात आली. याव्यतिरिक्तच टी 90 टॅंकसाठी आवश्‍यक असलेला थर्मल इमेजर, इशापोर रायफल फॅक्‍टरीद्वारे लांब पल्ल्याच्या लक्ष्यावर निशाणा साधण्यासाठी तयार करण्यात आलेली स्नायपर रायफलदेखील लॉंच करण्यात आली.

याप्रसंगी राजनाथ सिंह म्हणाले, जर संरक्षण क्षेत्रातील भारतीय सरकारी कंपन्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी कंपन्यांशी स्पर्धेसाठी उतरायचं असेल तर आपल्याला अपडेट व्हावे लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मॉडर्न टेक्‍निकचा वापर करायला हवा. यासाठीच सरकारने ऑर्डनंस फॅक्‍टरी बोर्डाचे कॉर्पोरेटायझेशन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी संरक्षणाला प्राधान्य असते. जे देश आपलं संरक्षण करण्यात सक्षम असतात त्यांची जागतिक स्तरावर प्रतिमा अधिक बळकट होते. आपल्या संरक्षणासाठी आवश्‍यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण विदेशातील संरक्षण सामग्री पुरवठादार आणि परदेशातील संरक्षण सामग्रींवर अवलंबून असणे योग्य नाही. हे आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांसाठी अयोग्य आहे. 

– राजनाथ सिंह, केंद्रीय संरक्षणमंत्री

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.