बंगळुरू – भारतीय हॉकी संघातील सहा खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याचे नुकतेच जाहीर झाले होते. आता याचा प्रभाव बॅडमिंटनमध्येही दिसत आहे. हैदराबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन शिबिरात सहभागी झालेल्या एन सिक्की रेड्डीला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिच्यासह सराव करत असलेल्या ऑलिम्पिकपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूलाही धोका निर्माण झाला आहे.
सिक्कीच्या फिजिओथेरेपिस्ट किरण जॉर्ज यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळेच सिक्कीला बाधा झाल्याचे वर्तवले जात आहे. खरेतर त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे दिसलेली नव्हती. मात्र, तरीही त्यांचा चाचणी आहवाल पॉझीटिव्ह आल्याने शिबिरात सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना चिंता लागली आहे. एन. सिक्की रेड्डी आणि किरण जॉर्ज यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यासह सराव करत असलेल्या सिंधूलाही करोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सिक्की आणि किरण यांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे बॅडमिंटन शिबिर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) बंद केले आहे.
या शिबिराचे आयोजन माजी ऑल इंग्लंड विजेता खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद त्याच्या अकादमीतर्फे घेत आहे. ही अकादमी संपूर्ण सॅनिटायझ केल्यानंतर बंद करण्यात आली आहे. या दोघींना कोरनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. दोघी मुळ हैदराबादच्याच आहेत आणि घरातून बाहेर पडून थेट शिबिरातच सहभागी झाल्या होत्या. सध्या या दोघी कोणाच्या संपर्कात आल्या होत्या याची माहिती घेतली जात आहे. शिबिरातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांचीही करोना चाचणी घेण्यात आली आहे.