श्रीनगर : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 सरकारने रद्द केल्यापासून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती या आजपर्यंत नजरकैदेत आहेत. दरम्यान, त्यांची आज त्यांच्या पक्षाचे एक प्रतिनिधी मंडळ भेट घेणार आहे.
पीडीपीचे एक प्रतिनिधी मंडळ सध्या श्रीनगरमध्ये नजरकैदेत असलेल्या त्यांच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेणार असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. पीडीपीच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व पक्षाचे सरचिटणीस वेद महाजन करतील, असे पक्ष प्रवक्ते फिरदौस टाक यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. केंद्र सरकारने घटनेतील कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्यानंतर 5 ऑगस्टला नजरकैदेत करण्यात आलेल्या मेहबूबा मुफ्तींशी पक्षाच्या नेत्यांची ही पहिलीच भेट असणार आहे. जम्मूतील पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाला मेहबूबा यांच्या भेटीची परवानगी द्यावी, अशी विनंती पीडीपीने राज्यपाल सत्यपाल मलिक यांना केली होती. त्यानुसार आज त्यांची ही भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.