हिर्डोशी खोऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आमदार थोपटेंना आश्वासन
भोर – भोर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी महाआघाडीतील कॉंग्रेसला जाहीर झाली आहे. मीच उमेदवार आहे असे समजून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांचेच काम करा, असा आदेश राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी याकामी बैठक घेऊन आमदार थोपटे यांनाच या निवडणुकीत विजयी करणार असल्याचे आश्वासन हिर्डोशी खोऱ्यातील मतदार बंधू-भगिनींना दिले आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी शनिवारी (दि. 5) हिर्डोशी खोऱ्यात गावभेट प्रचारदौरा केला, त्यावेळी हिर्डोशी येथे झालेल्या निवडणूक प्रचारसभेत हिर्डोशी खोऱ्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने वरील आश्वासन थोपटे यांना देण्यात आले.
आमदार संग्राम थोपटे यांनी नीरा देवघर धरण प्रकल्पातील शेतकऱ्यांचे उर्वरित पुनर्वसन, निर्वाहभत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. आपटी येथील नीरा नदीवर आपटी भावेखलला जोडणारा सुमारे दोन कोटी खर्चाच्या पुलाचे काम पूर्ण केले असून भावेखल साळव, रायरी ते शिरवली-माझेरीपर्यंतच्या गावांच्या ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
आपटी ते वरंधा घाटापर्यंतच्या सुमारे 27 कि.मी. लांबीच्या रिंगरोडचे डांबरीकरण व रुंदी करणासाठी 9 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, या मार्गाचे कामही सुरू झाले असल्याने ग्रामस्थांची खाचखळग्यांच्या रस्त्यापासून मुक्तता होणार असून वाहनचालकांची दैनंदिन वाहतुकीची गैरसोय दूर होणार आहे. डोंगरदऱ्या वाडीवस्तींवर राहणाऱ्या ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती थांबावी यासाठी पाणी योजना राबवणार आहे. कोंढरी गावात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांना भरपावसात स्थलांतरित होण्याची वेळ आली. या गावाचे पुनर्वसन करण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर केलेला असून, कोंढरी गावाचे थोड्यात दिवसांत पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
थोपटेंचा 24 गावांमध्ये गावभेट प्रचारदौरा
सांगवी भिडे, कारी, आंगसुळे, भावेखल, साळव, रायरी, कंकवाडी, दापकेघर, धानवली, धारांबे, पऱ्हर, निवंगण, गुढे, शिरवली हि. मा., माझेरी, कुडली, पऱ्हार खुर्द, दुर्गाडी, शिरगाव, उंबार्डे, आशिंपी, शिळींब, राजीवडी, हिर्डोशी, कारुंगण, धामुणशी, वारवंड, कोंढरी, वेणुपुरी, निगुडघर, देवघर, म्हसर बुद्रुक-खुर्द, करंजगाव, परखंदेवाडी, गोळेवाडी, आपटी, चऱ्हाटवाडी, नांदगाव, वाठार, साळेकर वाडी व पिसावरे आदी 24 गावांचा गावभेट प्रचार दौरा आमदार संग्राम थोपटे यांनी करून मतदारांशी संवाद साधला.