बालवाडीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहार

महिला व बालकल्याण समितीचा निर्णय : पालिकेच्या शहरात 207 बालवाड्या

पिंपरी – शहरातील बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या महिला व बालकल्याण विकास समितीने पोषण आहार देण्याचे ठरविले आहे. यंदापासून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराने विद्यार्थी व शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला आहे. महापालिकेने बालवाडीचे वर्ग सुरु केल्यापासून पोषण आहार मिळावा, अशी मागणी होत होती. अखेर या मागणीला यश आले आहे.

महापालिकेच्या शहरात 207 बालवाड्या असूनही विद्यार्थीभिमुख उपक्रमाअभावी बालवाड्या ओस पडल्या होत्या. या बालवाड्यांमध्ये सुमारे 8 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरातील खासगी बालवाड्यांच्या तुलनेत महापालिकेच्या बालवाड्यांमध्ये पटसंख्या कमी आहे. महापालिका बालवाड्यांमध्ये पटसंख्या वाढविणे, गणवेश वाटप व इतर विविध उपक्रम राबविणे आवश्‍यक आहे. मात्र, गेल्या 30 वर्षात कोणतेही उपक्रम राबविले जात नसल्याने बालवाडीची पटसंख्या दिवसेंदिवस घटत गेली. याबाबत, बालवाडीच्या महापालिकेतील मुख्य समन्वयिका संजीवनी मुळे व सुनीता तापकीर यांनीही सतत पाठपुरावा केला होता. महिला व बालकल्याण विकास समितीसमोर 2012 साली प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तत्कालीन सदस्यानी सदरचा प्रस्ताव नाकारल्याने ठोस निर्णय झाला नाही. यानंतर, या प्रस्तावाचा सतत पाठपुरावा केल्यानंतर या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

विद्यार्थ्यांचा आहार कसा असणार

बालवाडीच्या विद्यार्थ्यांना सहा दिवस शंभर गॅमपर्यतचा आहार मिळणार आहे. यामध्ये, विद्यार्थ्यांचे लहान व मोठा असे दोन गट केले जाणार आहेत. त्यात, कडधान्याची उसळ, पुलाव, उपीट, राजगिरा, शेंगदाणा आणु चुरमुरा लाडू मिळणार आहेत.

“यंदाच्या वर्षापासून बालवाडीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचे ठरविल्याने पालक-शिक्षक आनंदित झाले आहेत. तसेच, बालवाडीसाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केल्याने पटसंख्याही वाढत आहे. अनेक वर्ष केलेल्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला आहे.
-संजीवनी मुळे, बालवाडी समन्वयक, महापालिका

Leave A Reply

Your email address will not be published.