अमरावती – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार 9 जून रोजी उघड झाला होता. फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. मात्र या प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवण्यात आले. धमकीशी आपला कुठलाही संबंध नव्हता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवले. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, त्यामुळे मी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सौरभ पिंपळकर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांद्वारे शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. या धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे (34) याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजपा कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव घेण्यात आले होते. शेवटी सात दिवसांनंतर सौरभ पिंपळकर यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली.
सौरभ पिंपळकर म्हणाले, शरद पवार यांचा दाभोलकर होईल, या पोस्टशी माझा कुठलाही संबंध नाही. असे कोणतेही ट्विट मी केले नाही किंवा शेअरही केले नाही. त्या ट्विटला मी लाइकसुद्धा केले नाही. मी जे ट्विट केले होते, त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कतरण खात होता, त्याचे तोंड वाकडे होऊन गेले, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, असे म्हटले होते.
त्यात शरद पवार यांचे कुठेही नाव नव्हते. पण, त्यांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत भाजप खंबीरपणे उभा होता. या प्रकरणाचा माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे माझ्या आई-वडिलांची आणि पक्षाची माफी मागणार का? असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला.