कळंबच्या राजश्री कानडे यांच्या आरोग्यसेवेचे सर्वत्र कौतुक
मंचर- पुण्यातील ससूनच्या करोना वॉर्डमध्ये सकाळी 7.30 वाजता जाताना पीपीई कीट घालून दिवसाची सुरुवात होते. वॉर्डमधील सर्व परिचारिका सगळे मिळून “इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना म्हणून सर्व रुग्णांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. रुग्णांना त्यामुळे करोनासारख्या आजारातून बरे होण्यासाठी मानसिकरीत्या मदत होते. त्यानंतर रुग्णांचे बेडशीट बदलणे, त्यांना वेळच्या वेळी नाश्ता, जेवण, औषधे देणे, तसेच बाकी सर्व सेवा प्रामाणिकपणे दिल्या जातात. ससूनच्या परिचारिका राजश्री कानडे त्यांच्या शब्दांत त्याचे अनुभव सांगत होत्या.
कळंब (ता. आंबेगाव) येथील राजश्री नारायण कानडे गेली 24 वर्षे अधिपरिचारिका म्हणून रुग्णांच्या सेवेत अविरत काम करत आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात परीसेविका म्हणून त्या कार्यरत आहेत. करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर करोना वॉर्डच्या अतिदक्षता (आयसीयू) विभागात पहिल्या बॅचमध्ये त्यांनी सलग दहा दिवस काम केले आणि त्यांचा दहा दिवसाचा विलगिकरण कालावधी पूर्ण केल्यावर घरी आल्यावर “त्रिनिटी अपार्टमेंट, इ-प्रभाग-भोसरी” सोसायटीतील जनतेने आपलेपणाने केलेलं स्वागत पाहून त्यांना आपले आश्रू लपविता आले नाही.
पीपीई कीट घालून काम करणे अवघड आहे. बाहेर खूप तापमान असताना वॉर्डमधे एसी लावला जात नाही. या किटमधे खूप अस्वस्थ आणि गरम होते, सलग सहा ते सात तास अन्न, पाणी काहीही घेता येत नाही. बाथरूममध्ये जाता येत नाही. ड्युटी संपेल तेव्हा वॉर्डमध्येच आंघोळीची सोय केली आहे. त्यानंतरच पाणी पिता येते. 10 एप्रिलपासून करोना वॉर्डमध्ये त्या ड्युटी करत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार घरी न येता हॉटेलमध्येच राहावं लागतं होतं. राजश्री यांच्या घरी त्यांचे पती, दोन मुले आणि एक सून असा परिवार आहे. या सर्व काळात कुटुंबाने त्यांना खूप मोलाची साथ व आधार दिला आहे.
- ड्युटी संपून घरी आले, तेव्हा सोसायटीमधल्या सगळ्यांनी आपुलकीने, आदराने केलेल्या स्वागतानेभारावून गेले. आपण केलेल्या कार्याची अशा प्रकारे दखल घेतली गेल्याने पुढील कार्यासाठी अजून प्रेरणा मिळाली. अशा प्रकारे जर सर्व अत्यावश्यक विभागात काम करणाऱ्या सर्वांना सन्मानाची वागणूक मिळाली तर त्यांची मानसिकता सकारात्मक होईल, त्यांच्याकडून अधिक काम होईल आणि करोनासारख्या आजारातून आपला देश बाहेर पडणं खूप सोपं होईल.
– राजश्री कानडे, ससून परिचारिका