न्यूयॉर्क – डेलीमेल या वृत्तसंस्थेने न्यूयॉर्कमधल्या एका परिचारिकेचा हवाला देऊन म्हटले आहे की, न्यूयॉर्कमधील रुग्णालयात करोना रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवून त्यांना जिवे मारले जात असून त्यामुळेच अमेरिकेतील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
करोना संकटात रुग्णांची सुश्रूषा करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या परिचारिकेने तिचा धक्कादायक अनुभव मैत्रिणीच्या माध्यमातून जगापुढे आणल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. न्यूयॉर्कच्या रुग्णालयामधला प्रकार एखाद्या हॉरर चित्रपटात शोभण्यासारखा असल्याचे तिने म्हटले आहे. कोरोनाचे संकट गंभीर आहेच. मात्र न्यूयॉर्कमधल्या रुग्णालयात ज्या पद्धतीने हे संकट हाताळले जात आहे, ते जास्त गंभीर असल्याचे या परिचारिकेने म्हटले आहे.
न्यूयॉर्कच्या रुग्णालयात काम करत असलेल्या परिचारिकेने रुग्णांच्या नातेवाईकांना एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून असे आवाहन केले आहे की, तुमचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळींपैकी कोणालाही करोनामुळे रुग्णालयात दाखल केले जाणार असेल, तर त्यांना व्हेंटिलेटर ठेवले जाणार नाही, याची पुरेशी खात्री करून घ्या.
मी तिचा (परिचारिकेचा) आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. तिने मला सांगितलेल्या धक्कादायक घटना मी तुम्हाला सांगत आहे. न्यूयॉर्कमध्ये नेमके काय सुरू हे सगळ्यांपर्यंत पोहोचावे असे तिला वाटते. तिथे (रुग्णालयात) सुरू असलेला हलगर्जीपणा तिने याआधी कधीही पाहिलेला नाही. कोणालाच रुग्णांची चिंता नाही. ते अतिशय थंडपणे काम करत आहेत आणि त्यांना रुग्णांची जराही चिंता नाही, अशी धक्कादायक माहिती या परिचारिकेने तिच्या मैत्रिणीला दिली आहे.