पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – “करोना’च्या चाचणीसाठी चार हजारांहून अधिक खर्च येत असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व उपचार मोफत करण्यात येत असून रुग्णांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नसल्याचे “वायसीएम’चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय पदव्युत्तर संस्थेत सध्या केवळ करोना (कोविड-19) या संसर्गजन्य आजाराच्या संशयित व बाधित रुग्णांवरच उपचार सुरू आहे. रूग्णालयात फिव्हर क्लिनिक तसेच नातेवाईकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. करोनाबाधित रुग्णांचे संपूर्ण उपचार हे मोफत करण्यात येत आहे. आवश्यक चाचण्यांचे तसेच उपचार शुल्क रूग्णांच्या नातेवाईकांकडून कोणत्याही स्वरूपात आकारले जात नसल्याचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.
उपचार कालावधी दरम्यान रुग्णाला नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण मोफत देण्यात येत आहे. करोनाशिवाय अन्य आजार असल्यास संबंधित व्यक्ती अथवा नातेवाईक यांनी वायसीएम रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून संदर्भ सेवा पत्र घेऊन वायसीएम शेजारी असलेल्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेता येईल. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी उपचारासाठी येताना आधार कार्ड व रहिवासी असल्याचा पुरावा हा मोबाइलमध्ये फोटो काढून ठेवावा. रुग्णालयात दाखल होताना त्यामुळे नोंदणी प्रक्रियेसाठी सुलभता येईल. तसेच, पूर्वीचे काही गंभीर आजार असल्यास त्याबाबतची कागदपत्रे व औषधे सोबत ठेवावी. त्यामुळे रुग्णाचे उपचार योग्य दिशेने करणे सुलभ होणार आहे.
तसेच, करोना आजार वगळता अन्य आजारांसाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पिवळी, केशरी शिधापत्रिका, आधारकार्ड, ओळखपत्र सोबत आणावे. त्यामुळे त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आदींचा लाभ घेता येईल.