ओझरमध्ये श्रीगणेश जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू
ओझर -श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे आजपासून गणेश जयंतीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली, यावेळी पालखीचे प्रस्थान पहिला पूर्वद्वार करण्यासाठी झाले, असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे यांनी दिली.
यावेळी सकाळी साडेसात वाजता श्रींची महाआरती झाली. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ हभप गणेशमहाराज वाघमारे यांच्या हस्ते वीणा पूजनाने करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे, सचिव आनंदराव मांडे, खजिनदार किशोर कवडे, विश्वस्त अजित कवडे, गणपत कवडे, गणेश कवडे, विजय घेगडे, कैलास मांडे, कैलास घेगडे, मंगेश मांडे, राजश्री कवडे व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
सकाळी आठ वाजता घट बसविणे, साडेआठ ते नऊ अल्पोपहार, नऊ ते साडेदहा पारायण आणि नंतर पालखीचे प्रस्थान पहिला पूर्वद्वार करण्यासाठी झाले. पूर्व शिवेच्या बाजूच्या मुक्ताई मंदिरापर्यंत पालखी जाऊन त्याठिकाणी पूजन होऊन दुपारी दीड वाजता मोरया गोसावींच्या पदांचे गायन करून पालखी मंदिराकडे आली.
दुपारी 11 ते 4 पर्यंत नियमाचे भजन, सायंकाळी 5 ते 6.30 पर्यंत हरिपाठ व रात्री 7 ते 9 या वेळेत हभप पुरुषोत्तममहाराज पाटील (आळंदी) यांचे कीर्तन झाले. आजच्या कीर्तनरूपी सेवेचे भावपुष्प श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व विश्वस्त मंडळाकडून होते. सकाळी प्राची मांडे, अथर्व कुटे आणि रात्री गणपत टेंभेकर, अविनाश मांडे यांनी वारकरी, भाविकांना अन्नदान दिले.
अल्पोपहार देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अजित कवडे यांनी दिला. अन्नदान, भावपुष्प, अल्पोपहार, देणाऱ्या मान्यवारांचा सत्कार देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. रात्री 10.30 ते पहाटेपर्यंत विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ यांनी हरिजागर केला.