18 शाळांमधील 43 विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
पिरंगुट – कासार आंबोली (ता. मुळशी) येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत “गो गर्ल गो’ ही शंभर मीटर धावण्याची स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय – पुणे, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा – कासार आंबोली आणि मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 18 शाळांमधील 43 विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कासार आंबोलीचे उपसरपंच सचिन धुमाळ आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी उपसरपंच उमेश सुतार, ग्रामपंचायत सदस्य मोहन शिंदे, उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी, मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघाचे सचिव संदीप पवार, सहसचिव संतोष बनकर, संपर्कप्रमुख बाळासाहेब गायकर, क्रीडा विषयतज्ज्ञ उमेश थोपटे, क्रीडा शिक्षक नितिन कांबळे, सर्व क्रीडा शिक्षक आणि पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन सैनिकी शाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा विभाग प्रमुख संदीप पवार व सहकाऱ्यांनी केले होते.
यशस्वी विद्यार्थिनी आणि शाळा पुढीलप्रमाणे –
6 ते 9 वयोगट – आदिती गरूड (पिरंगुट – प्रथम), अंजली पिलगुरे (भूगाव – द्वितीय), स्मितल सैंदाणे (पिरंगुट – तृतीय).
10 ते 14 वयोगट – साक्षी गायकवाड (नांदे – प्रथम), लंचेन थॉकचॉम (रिव्हरडेल इंटरनॅशनल स्कूल रावडे – द्वितीय), अपेक्षा भोसले (राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली – तृतीय)
14 ते 18 वयोगट – मोहिनी माने (न्यू इंग्लिश स्कूल मारूंजी – प्रथम), राणी जाधव (स्वामी विवेकानंद विद्यालय आसदे मुळशी -द्वितीय), सृष्टी रायबन (म.ए.सो. राणी – तृतीय)