पुणे – रेल्वेतून प्रवाशाचा मोबाइल चोरणाऱ्यासह त्याच्या साथीदाराला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. पुणे रेल्वे स्थानकात रेल्वेतून मोबाइल चोरल्याची तक्रार एका प्रवाशाने केली आहे. या तक्रारीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शोध घेतला.
स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. या फुटेजमध्ये आढळलेली व्यक्ती ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, दौंड येथे त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद असल्याचे निदर्शनास आले.
संशयित आरोपीला पकडण्यासाठी दोन दिवस विविध ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर पुणे स्थानकात आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पकडले. मोबाइलची चोरी करून दुसऱ्या व्यक्तीला विकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले आहे.