पॅरिस – फ्रान्समध्ये सरकारविरोधी तीव्र निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे पॅरिसच्या रस्त्यांवर जाळपोळ, दगडफेक, घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. वास्तविक, सरकारच्या निर्णयामुळे ही आंदोलने होत आहेत. बातमीनुसार, फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारने सरकारी नोकरांच्या सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवले आहे. त्यामुळे मोठा जनक्षोभ उसळला असून अचानकपणे आंदोलन उग्र बनले आहे.
गुरुवारी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 64 वर्षे केले आहे. फ्रान्सच्या पेन्शन प्रणालीला कंगाल होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे, असा युक्तिवाद सरकारचा आहे. यासाठी फ्रान्सच्या संसदेत मतदान होणार होते, मात्र फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी घटनात्मक तरतुदीचा वापर करून संसदेत मतदान न करता नवा कायदा लागू केल्याचाही रोष आंदोलक व्यक्त करत येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकारच्या नव्या निर्णयाच्या निषेधार्थ पॅरिसमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनाला हिंसक वळण लागले. यानंतर पॅरिसच्या रस्त्यांवर जाळपोळ आणि दगडफेकीचे प्रकार पाहायला मिळाले.
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्नही केला. त्याचवेळी फ्रान्सच्या संसदेत या कायद्याला विरोध होत असून अनेक खासदार विरोध करत आहेत. या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निदर्शनांमुळे पोलिसांनी सुमारे 120 जणांना अटक केली आहे.