नवी दिल्ली – फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर या टॉवरच्या परिसरातील शेकडो पर्यटकांना आज हटवण्यात आले आणि संपूर्ण टॉवरची कसून तपासणी करण्यात आली. टॉवरच्या तिन्ही मजल्यावरील पर्यटकांना तातडीने तेथून हटवण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉम्ब शोधक आणि नासक पथकाकडून संपूर्ण टॉवरची तपासणी केली जात आहे. टॉवरच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटचीही तपासणी केली जात असल्याचे टॉवरच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या “एसईटीई’ नावाच्या एजन्सीने सांगितले.
अशा परिस्थितीमध्ये अशी तपासणी केली जाणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. मात्र असा प्रकारची तपासणी फारच कमी वेळा करायला लागते, असे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या तज्ज्ञांनी सांगितले.
जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेल्या आयफेल टॉवरला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. टॉवरच्या दक्षिणेकडील खांबाजवळ एक पोलीस स्टेशन देखील आहे. आयफेल टॉवरच्या परिसरावर सीसीटिव्हीच्या माद्यमातून लक्ष ठेवण्यात येत असते. तसेच पर्यटकांना टॉवरच्या आतील भागामध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्यांची कसून तपासणी देखील केली जात असते.