मुंबई – आपचे राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांचे राज्यसभेतून निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली प्रस्तावात फेरफार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी ही कारवाई केली आहे.
याशिवाय ‘आप’चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही अडचणी कमी झालेल्या नाहीत. त्यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपच्या दोन्ही नेत्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, खासदार राघव चड्ढा यांचे निलंबन होण्यापूर्वी राघव चढ्डा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा हे मुंबई विमानतळावर स्पाॅट झाले होते. यावेळी राघव चढ्डा आणि परिणीती चोप्रा यांच्या चेहऱ्यावर टेन्शन हे बघायला मिळाले.
इतकेच नाही तर यावेळी पापाराझी यांना फोटोसाठी पोझ न देताच परिणीती आणि राघव निघून गेले. सध्या या दोघांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल असून, नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
राघव चड्ढा आणि परिणीतीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला आहे. अत्यंत शाही पद्धतीने हा सोहळा पार पडला होता. चाहते आता परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.