बॉलिवूडमध्ये काही काळापासून बायॉपिक चित्रपटांची चलती सुरू आहे. संजय दत्त, मेरी कोम, एमएस धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकनंतर आता माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ वैज्ञानिक, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायॉपिक साकारणार असल्याची चर्चा सुरू आहे.
आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ट्विटरवर ट्वीट केले आहे की, कलाम यांच्या बायॉपिकमध्ये ते या थोर शास्त्रज्ञांची भूमिका साकारताना दिसणार आहे. परेश रावल यांनी ट्विटद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. कलाम यांचे छायाचित्र पोस्ट करत त्यांनी लिहिले, माझ्या मते ते संत कलाम होते. कलाम साहेबांच्या बायॉपिकमध्ये मी त्यांचे पात्र साकारणार आहे, हे माझे भाग्य आहे.
दरम्यान, यापूर्वी परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायॉपिकमध्ये मोदींची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण हा चित्रपट बनूच शकला नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या बायॉपिकमध्ये विवेक ओबेरॉय यांनी मोदींची भूमिका साकारली. ज्येष्ठ अभिनेता परेश रावल यांनी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. यामुळे त्यांच्या आगामी बायॉपिकबाबत प्रेक्षकांना आतापासून उत्सुकता निर्माण झालेली आहे.