महेश चव्हाण यांचा सल्ला : पिरंगुट येथे “सायबर सेफ वुमन’वर कार्यशाळा
इंटरनेटचा वापर काळजीपूर्वक करावा
पुणे – इंटरनेच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या ऑनलाइन फ्रेंड्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुण्यातील पिरंगुट, ता. मुळशी येथे महाराष्ट्र सायबर विभाग तसेच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने “सायबर सेफ वुमन’ विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी चव्हाण बोलत होते. कार्यशाळेत मुळशी पंचायत समिती उपसभापती विजय केदारी, सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच अण्णा गोळे, पीआयबीएम मॅनेजमेंट संस्थेचे चेतन गवळी, पौड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा “सायबर सुरक्षा बाबतचा संदेश’ दाखविण्यात आला.
चव्हाण म्हणाले, वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर उघड केल्यामुळे बरेचदा गुन्हे घडले आहेत. यासाठी स्वतःची माहिती, छायाचित्रे, पासवर्ड, ई मेल, पोस्ट करण्यापूर्वी दक्षता घेणे गरजेचे आहे. सोशल माध्यमातून अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट मुला-मुलींनी टाळायला हव्यात. सायबर गुन्हे घडू नयेत यासाठी सायबर सुरक्षा विषयी महिलांनी माहिती घ्यायला हवी.
लवटे म्हणाले, कार्यशाळेत सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, महिलांच्या बाबतीत घडणारे सायबर गुन्हे, महिलांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सोदाहरणासह माहिती देण्यात आली. तसेच मोबाईल व इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची दक्षता, महिला सुरक्षा बाबतीत पोलीस प्रशासनाचे असणारे उपक्रम यांचीही माहिती देण्यात आली. कार्यशाळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते.