पोलीस वर्धापन दिन समारंभात मुख्यमंत्र्यांना मानवंदना
मुंबई : ‘आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या समारंभात पोलीस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या पहिल्याच संचलनात मानवंदना स्विकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा बनल्याचे नमूद केले.
ते म्हणाले, वर्ष संपताना नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत समारंभास तर नवीन वर्ष सुरू होताना या देखण्या आणि शिस्तबद्ध संचलनाचे साक्षीदार होता आले, हा आनंददायी योगायोग आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टिकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे.
पोलीसांसाठी या “अभय मुद्रा’ वरील ब्रीदवाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलीसांना “मानाचा मुजरा’ या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फोर्स वन या विशेष पोलीस दलाच्या जोगेश्वरी येथील प्रशिक्षण केंद्रास भेट दिली.
पोलिसांच्या निवासस्थान संकुलाचे भूमीपूजन संपन्न
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रिडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त 448 सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 225 कोटी 13 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी यांनी स्वागत केले व प्रकल्पाची माहिती दिली.
महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज
महाराष्ट्र पोलीस दल दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा करते. महाराष्ट्र पोलीस दलास या दिवशी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला होता. ज्यामुळे महाराष्ट्र पोलीसांना विशेष दर्जा मिळाला. या ध्वजावर पोलीस दलाचे “अभय मुद्रा’ हे बोधचिन्ह म्हणजे उजव्या हाताचा पंजा चित्रांकीत आहे. त्यामध्येच “वाईटाचा नाश आणि चांगल्याचे रक्षण’ या अर्थाचे जनतेला संरक्षणाची ग्वाही देणारे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे संस्कृतमधील पोलीसांचे ब्रीद समाविष्ट आहे.