अबाऊट टर्न: दृष्टान्त

हिमांशू

झाडावरून पडणारं फळ नेहमी जमिनीवरच पडतं आणि जगात कोणतंही नवीन तंत्रज्ञान जन्माला आलं तरी त्याचं मूळ अखेर प्राचीन भारतातच सापडतं. पुष्पक विमान तर त्या काळी होतंच; शिवाय महाभारताच्या काळात इंटरनेटसुद्धा होतं. त्याच्या साह्यानेच युद्धभूमीवरील घडामोडी संजय धृतराष्ट्राला सांगत होता. क्‍लोनिंग असो, टेस्ट ट्यूब बेबी असो वा प्लॅस्टिक सर्जरी असो, हे तंत्रज्ञान जगाला नवीन असलं तरी भारतात जुनंच आहे. विशेष म्हणजे, भारतात स्पेक्‍ट्रम वाटपात घोटाळा झाला तसा महाभारतात झाला नव्हता. इंटरनेटची गती मात्र इतकी होती की हे प्राचीन नेटवर्क फाइव्ह-जीच्याच तोडीचं असावं, अशी शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्बन डाय ऑक्‍साइड ग्रहण करून ऑक्‍सिजन सोडणारा प्राणीही भारतातल्याच नेत्यांना सापडला आणि डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत भारतातल्या नेत्यांनीच खोडून काढला. आता गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतही भारतीयांनाच सर्वांत आधी समजल्याचे पुरावे मिळालेत. हा सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी मांडल्याचं सामान्यतः मानलं जातं. परंतु केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केलेल्या दाव्यानुसार, न्यूटनच्या कितीतरी वर्षें आधी भारतीयांना गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत माहीत होता आणि तो ग्रंथबद्धही करण्यात आला होता. मंत्री महोदयांनी ग्रंथांची नावं सांगितली नसली, तरी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्या शैक्षणिक धोरणावर चर्चा करताना दावा केलेला असल्यामुळं तो खरा असला पाहिजे.

सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराचा तपशील आणि मंत्रिमहोदयांचा दावा वृत्तपत्रात एकाच पानावर वाचताना आम्हाला एक दृष्टान्त झाला. होय, दृष्टान्तच! विश्‍वास ठेवा अगर ठेवू नका; पण एकापाठोपाठ एक अशा अनेक गोष्टी आमच्या मेंदूत वीज चमकल्यासारख्या चमकू लागल्या. आपले पूर्वज खरोखर अत्यंत ज्ञानी होते. गणेशोत्सवात ते मातीच्याच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करीत असत. फार पूर्वी नव्हे, तर पंचवीस-तीस वर्षांपूर्वी ते कापडाची पिशवी घेऊन बाजारात जात असत. प्लॅस्टिक त्यांना ठाऊक नव्हतं. आपले पूर्वज नद्यांमध्ये अतिक्रमण करून घरं बांधत नसत. मिनरल वॉटर त्या काळात उपलब्ध नव्हतं म्हणून असेल कदाचित; पण नद्या प्रदूषित होऊ नये याची काळजी ते घेत असत! अनेक वृक्षांना त्यांनी देव मानलं होतं. अनेक हिंस्र जंगली प्राण्यांना आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या देवांचं वाहन मानलं. देवटाके, देवराई अशा असंख्य संकल्पना आपल्या पूर्वजांनी मांडल्या, साकारल्या आणि जपल्या!

आज महापुराला जबाबदार ठरलेल्या परिस्थितीचा शोध घेताना अभ्यासक पुनःपुन्हा नद्यांमध्ये झालेली अतिक्रमणं आणि निसर्गाच्या विध्वंसाकडेच वळत आहेत. डोंगराळ भागात अवजड यंत्रसामग्रीनं खोदकाम करून विकासकामं रेटल्यामुळं भूस्खलनाचे प्रकार घडतायत, असंही सांगितलं जातंय. डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं होताना बघून तरी पूर्वजांच्या ज्ञानाकडे वळायला हवं. व्यासपीठावरून नव्हे; जमिनीवरून! अर्थात हा आम्हाला झालेला व्यक्‍तिगत दृष्टान्त!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)