संगीतकार खय्याम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई  -हिंदी चित्रपटसृष्टीतील बुजूर्ग संगीतकार खय्याम यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सोमवारी रात्री येथील रूग्णालयात निधन झाले.

अंत्यविधीपूर्वी खय्याम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या जुहूमधील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. अंत्यसंस्कारांवेळी खय्याम यांच्या कुटूंबीयांबरोबरच बॉलीवूडमधील बरीच मंडळी उपस्थित होती. त्यामध्ये प्रामुख्याने गुलजार आणि जावेद अख्तर या ज्येष्ठ गीतकारांबरोबरच दिग्दर्शक विशाल भारद्वाज, संगीतकार जतिन-ललित, गझल गायक तलत अझिझ, अभिनेत्री पूनम धिल्लन यांचा समावेश होता.सोनू निगम, उदित नारायण, अलका याज्ञिक या पार्श्‍वगायकांनीही खय्याम यांचे अंत्यदर्शन घेतले.

खय्याम यांनी त्यांच्या कर्णमधूर संगीताने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. उमराव जान, कभी कभी, त्रिशूल, नुरी, शोला और शबनम या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत रसिकप्रिय ठरले.

खय्याम यांना 2007 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर चार वर्षांनी त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी एका ट्रस्टची स्थापना केली. उभरत्या कलाकारांना मदत करण्याच्या उद्देशातून सर्व संपत्ती त्या ट्रस्टला दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×