प. महाराष्ट्राच्या पडझडीतही साताऱ्याचा बालेकिल्ला अभेद्यच

मताधिक्‍य घटल्याने राष्ट्रवादी व उदयनराजेंना आत्मचिंतनाची गरज 
सातारा – पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या चिरेबंदी वाडयाची बरीच पडझड झाली. पण साताऱ्याचा चिरा मात्र पुन्हा एकदा अभेद्य राहिला. खासदार उदयनराजे भोसले यांनी सव्वा लाखाच्या मताधिक्‍याने दिल्ली गाठली पण मतदारराजाने राष्ट्रवादीला “टिकटिक वाजते डोक्‍यात’ हा कानमंत्रही दिला. मताधिक्‍य घटल्याने राष्ट्रवादी व उदयनराजेंना आत्मचिंतन करावे लागेल, असा स्पष्ट संदेश मतदारराजाने दिला. छत्रपती घराण्याविषयी आत्मियेतून सातारकरांनी पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना संधी दिली. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना तेहतीस हजाराचे लीड मिळाले. शिवेंद्रराजे यांच्या बांधणीतल्या जावळीने उदयनराजे यांना मताधिक्‍य दिले.

पवारांच्या आदेशानुसार दोन्ही राजांनी राजकीय सामंजस्य दाखवल्याने साताऱ्यात उदयनराजे सेफ झोनमध्ये राहिले. वाई- खंडाळा- महाबळेश्‍वरमध्ये मकरंद पाटील यांची संच बांधणी मजबूत होती. या मतदारसंघात राजेंना तीस हजाराचे लीड मिळाले. माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर महाबळेश्‍वर ते खंडाळा हा मतदारसंघ उभा आडवा पिंजून काढला. त्यांना पुरूषोत्तम जाधव यांची सुद्धा साथ मिळाली. मात्र मकरंद आबा व नितीन काका यांनी निर्णायक टप्प्यात राजकीय बेरजा करत मतविभागणी होणार नाही याची काळजी घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर संशयाची सुई होती मात्र, आमदार बाळासाहेब पाटील यांनी चोख भूमिका बजावल्याने या मतदारसंघात उदयनराजे यांना चाळीस हजार मताधिक्‍याची निर्णायक रसद मिळाली. या मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची एकत्र ताकद दिसली. पदयात्रा व विभागीय मेळाव्यांनी सारेच वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याने युतीला येथे यश मिळाले नाही. पाटण विधानसभा मतदारसंघात देसाई- पाटणकर या पारंपारिक गटात कडवी लढत पाहायला मिळाली. नरेंद्र पाटील या तालुक्‍यातील स्थानिक असल्याने साडेअठरा हजाराचे लीड पाटील यांना मिळाले. पाटणकर पिता- पुत्रांनी पाटण तालुक्‍याच्या वाड्यावस्त्या पिंजून काढल्या. सत्यजित पाटणकर यांनी मोठी राजकीय ताकद उभी केली. नरेंद्र पाटलांच्या भाजप टू शिवसेना या पक्षांतराने मताधिक्‍ययात घट झाल्याचे जाणवले.

कराड दक्षिणमध्ये पाटील यांना मताधिक्‍य मिळाले. कराड दक्षिणमध्ये उदयनराजे यांच्याविषयी असणारी नाराजी युतीला अल्प प्रमाणात कॅश करता आली. पृथ्वीराज चव्हाण यांनी गट व गणनिहाय मेळावे घेऊन मतदार राजाला भावनिक लाटेत वाहून जाऊ दिले नाही. युतीमध्ये रसद भाजपची व उमेदवार सेनेचा या परिस्थितीत अंतर्गत गटबाजीचा फटका बसला. उंडाळकर गटाचा तटस्थपणाही मोठा राजकीय परिणाम करून गेला. सातारा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मताधिक्‍य टिकवल्यामुळे उदयनराजेंचा विजय झाला. मात्र दोन मतदारसंघात पाटील यांना आघाडी मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)