नवी दिल्ली – नवोदित यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला सातत्याने अपयश येत असले तरीही काही खेळाडू त्याची बाजु घेत आहेत. त्यात सुरेश रैनानेही पंतला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे व्यक्त केले आहे.
भारतीय संघात स्थान मिळविण्यापूर्वी देखील मी त्याची कामगिरी पाहिली आहे. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. काही सामन्यात त्याला अपयशाचा सामना करावा लागला असला तरी तो हार मानणारा खेळाडू नाही. त्याच्याकडे जिद्द आहे केवळ काहीवेळा दर्जाला साजेशी कामगिरी होत नाही. त्यामुळे त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी पंतची तुलना केली तर पंत सामान्यच वाटेल मात्र त्याच्याकडे एक नवोदित खेळाडू म्हणून पाहिले तर त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्याला पाठिंबा देण्याची आवश्यकता असल्याचेही जाणवेल.
धोनी हा धोनी आहे त्याचा पर्याय कोणीच होऊ शकत नाही. मात्र, असे बोलून पंतचे मनोधैर्य खच्ची करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा त्याचा आत्मविश्वास कसा वाढेल हे पाहिले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही रैनाने व्यक्त केली. पंत चांगला खेळाडू आहे. त्याच्या फलंदाजीची शैली ही सचिन, सेहवाग यांच्यासारखीच अव्वल आहे, असा विश्वासही रैनाने व्यक्त केला.