पांगारी “आऊट ऑफ कव्हरेज एरिया’

भाटघर – भोर तालुक्‍यातील पांगरी परिसरात मोबाइल टॉवर नसल्यामुळे रेंजची गंभीर समस्या बनली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते लागत असून, संपर्क होत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. या भागात पांगारी गावच्या टेकडीवर दोन वर्षांपूर्वी बीएसएनएलचा मोबाइल टॉवर उभा होता. मात्र, सध्या हा टॉवर बंद अवस्थेत आहे.

भाटघर धरणाच्या दक्षिण बाजूस 18 किलोमीटर अंतरावर वेळवंड हे गाव आहे. मोबाइलची रेंज याच गावापर्यंत येत असून, यापुढे अंदाजे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर रेंज नाही. यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आजच्या जीवनात प्रमुख गरजांपैकी मोबाइल ही अत्यंत महत्त्वाची गरज असून, याद्वारे काही सेकंदातच संपर्क होत आहे. मोबाइलमुळे मानवी जीवनमान उंचावले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मेलद्वारे ऑफिसमधील अनेक कामे सुरळीत व कमी वेळेत होत आहेत; परंतु या ठिकाणी रेंज नसल्याने या प्रगत सुविधांपासून येथील नागरिक वंचित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “डिजिटल इंडिया’ची घोषणा केली असून, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक कामांनी जोर धरला आहे; परंतु या ठिकाणी स्थानिक नागरिक या सुविधांपासून वंचित राहिला आहे. केंद्र शासनाने सर्वसामान्यांसह सर्वांचेच कामे कमी वेळेत व्हावीत या हेतूने ऑनलाइन सुविधा सुरू केल्या आहेत. अनलिमिटेड टॉकटाइम व पुरेसा डाटा अशा सुविधा अल्प रकमेत विविध मोबाइल कंपन्यांकडून ग्राहकांना पुरवल्या जात आहेत. यासाठी काही मर्यादित काळासाठी फोर-जी पॅकेज येथील नागरिक विकत घेत आहेत; परंतु या परिसरात आल्यानंतर रेंजचा अभाव असल्याने या सुविधांचा उपयोग होत नाही. यामुळे विकत घेतलेले पॅकेजचे पैसे वाया जात असल्याचे येथील ग्राहक सांगत आहेत.

आमच्या नातेवाइकांना आमच्याकडे संदेश पाठवायचा असल्यास पोस्टद्वारे कार्डच्या माध्यमातून आम्हाला कळवले जात आहे. एखादी घटना घडल्यास रेंजअभावी तात्काळ संपर्क करता येत नाही. यासाठी उभा केलेला बीएसएनएल टॉवरची सुविधा लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे.
– वंदना कंक, सरपंच, पांगारी गाव 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.