नवी दिल्ली – आधार कार्ड हे एक महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे. त्याचबरोबर पॅनकार्ड देखील खूप महत्वाचे आहे. सरकारच्या सूचनेनुसार पॅनकार्ड आधारशी जोडणे (पॅन-आधार लिंक) बंधनकारक करण्यात आले आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता हे काम 31 मार्च 2021 पर्यंत करण्यास वेळ देण्यात आला आहे. जर 31 मार्च 2021 पर्यंत लिंक केले नाही तर प्राप्तिकर कायद्यांतर्गत 10,000 रुपये दंडही लागू शकतो.
कर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर कोणी 31 मार्च 2021 नंतर निष्क्रिय किंवा रद्द केलेले पॅनकार्ड वापरत असल्याचे आढळले तर त्याला आयकर कायद्याच्या कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. मार्चपर्यंत करदात्यांनी पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल, असे अधिसूचनेत कर विभागाने म्हटले आहे.
लिंक केलेले नसल्यास पॅन कार्ड अवैध होईल –
पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक आहे. हे न केल्यास पॅनकार्ड अवैध केले जाईल. पॅनकार्ड रद्द केल्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणजे, पॅन असूनही जेथे पॅन आवश्यक असेल तेथे आपण त्याचा वापर करू शकणार नाही. सीबीडीटीने म्हटले आहे की, जे टॅक्स रिटर्न भरत आहेत त्यांना पॅनकार्ड आधारशी जोडणे बंधनकारक आहे.
अशा प्रकारे पॅन-आधार लिंक करा –
* सर्वप्रथम आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत साइटवर जा. त्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.
* नंतर click here वर क्लिक करा. त्यानंतर खालील बॉक्समध्ये पॅन, आधार क्रमांक, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.
* सर्व माहिती भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.
* नाव आणि नंबर व्यवस्थित भरावेत.
याशिवाय पॅन सेंटरवर जाऊनही पॅनकार्डला आधारशी जोडले जाऊ शकते. यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत आणि 25 ते 110 द्यावे लागतात.