बीजिंग – इराण आणि पाकिस्तान दरम्यान ताणले गेलेले संबंध पुन्हा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांचे चीनने स्वागत केले आहे. त्याचबरोबर इराणकडून पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि भौगोलिक एकात्मतेच्या रक्षणाची हमी देखील चीनने दिली आहे. इराणकडून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्र डागली गेल्याच्या पार्श्वभुमीवर चीनने पाकिस्तानला ही हमी दिली आहे.
इराण आणि पाकिस्तानमधील तणाव दूर करण्यासाठी चीनने १८ जानेवारी रोजीच मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवली होती. त्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री सून वेडोंग यांनी तातडीने पाकिस्तानला भेट देखील दिली होती. दोन्ही देशांनी संयम बाळगावा, असे आवाहनही चीनने केले होते. तसेच मध्यस्थीसाठी दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचेही चीनने म्हटले होते.
इराणने १६ जानेवारी रोजी बलुचिस्तानमध्ये जैश अल-अदल या दहशतवादी गटाच्या दोन तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही इराणमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्यात ९ जण ठार झाले होते. मात्र दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे चीनने स्वागत केले आहे. तर चीनने दाखवलेल्या पाठिंब्याबद्दल पाकिस्ताननेही चीनचे आभार मानले आहेत.
चीनकडून सीपीइसीचा पाठपुरावा
चीनचे परराष्ट्र मंत्री सून वेडोंग यांनी पाकिसतानच्या भेटीमध्ये पाक अध्यक्ष आरिफ अली यांचीही भेट घेतली होती. यावेळी त्यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या अंमलबजावणीचाही पाठपुरावा केला होता. दोन्ही देशांच्या समान पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यात पाकिस्तानने पुढाकार घ्यावा, असा आग्रह त्यांनी यावेळी धरला.