इस्लामाबाद – पाकिस्तानातील करोनाग्रस्तांची संख्या 2400 वर गेली असून त्यात आत्तापर्यंत 35 जण दगावले आहेत. तथापि, पाकिस्तानने देशात लॉकडाऊन जाहीर केलेला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये असा आदेश देशभर लागू करण्यात आला असला तरी धार्मिक कारणाने मोठ्या प्रमाणात लोक तेथे एकत्र येण्याचे प्रमाण मात्र अजून आटोक्यात आलेले नाही.
या मोठ्या जमावाला कसा आळा घालयचा हा प्रश्न तेथील पोलीस व प्रशासनापुढे आहे. पंजाब आणि सिंध प्रांतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारच्या नमाजासाठीही पाच पेक्षा अधिक लोकांनी जमू नये अशी सूचना पाकिस्तान सरकारने केली होती पण त्यांची ही सूचना तेथे पाळली जात नसल्याचे दिसून आले आहे.
लोकांनी मशिदीत जाऊ नये अशी विनंती सरकारी पातळीवरून केली जात असली तरी लोक त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे करोना वेगाने पसरण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.