जम्मू -भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानी महिला घुसखोर ठार झाली. ती घटना जम्मूतील आर.एस.पुरा क्षेत्रात रविवारी रात्री घडली. बीएसएफच्या सतर्क जवानांनी रात्रीच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेच्या लगत संशयास्पद हालचाली हेरल्या.
भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे त्यांना आढळले. जवानांनी भारतीय हद्दीत शिरकाव न करण्याचा इशारा वारंवार दिला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत संबंधित महिला भारतीय हद्दीच्या दिशेने धावत राहिली.
अखेर घुसखोरीचा डाव हाणून पाडण्यासाठी जवानांनी गोळीबार केला. त्यामध्ये ती महिला ठार झाली. तिची ओळख तातडीने पटू शकली नाही. पाकिस्तानी बाजूकडून भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न अनेकदा होतात. मात्र, बीएसएफच्या सतर्कतेमुळे ते बहुतांश डाव अयशस्वी ठरतात.