जयपूर – पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली. मोहम्मद युनूस असे त्याचे नाव आहे. लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली जात असल्याचे समोर आले.
त्यावरून गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या. त्यानंतर संशयावरून युनूसला अजमेरमध्ये पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीवेळी तो पाकिस्तानमधील काही जणांच्या संपर्कात असल्याचे सूचित झाले. त्यांना तो व्हॉटस्ऍपवरून गोपनीय माहिती पुरवत होता. आता त्याची विविध यंत्रणांकडून संयुक्त चौकशी केली जाणार आहे.
त्या चौकशीतून नापाक कारवायांवर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. युनूस एका सरकारी रूग्णालयाच्या पार्किंग लॉटमध्ये काम करतो. त्याचे स्थानिक पातळीवर कुणी साथीदार आहेत का याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.