चंदिगड -पंजाबमध्ये उद्या (रविवारी) विधानसभेसाठी मतदान होणार आहे. एकूण 117 जागांसाठी उभ्या असलेल्या 1,304 उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरवण्यासाठी 2.14 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या उमेदवारांमध्ये 93 महिला आहेत.
पंजाबमध्ये बहुरंगी लढत होणार आहे. कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल-बहुजन समाज पार्टी आघाडी, भाजप- पंजाब लोक कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) यांच्याशिवाय संयुक्त किसान मोर्चा या निवडणूकीत आपले नशीब आजमावत आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या संघटनेने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन ही लढत अधिक रंगतदार केली आहे. वीज बिल आणि इंधनाचे दर कमी करण्याच्या निर्णयांचा फायदा होण्याची कॉंग्रेसला अपेक्षा आहे. मात्र कॉंग्रेसपुढे भ्रष्टाचाराच्या मुट्याचे आव्हान आहे. पंजाबमध्ये “आप’ने कॉंग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. तर बसपाबरोबर आघाडी केलेल्या अकाली दलालाही विजयाची अपेक्षा आहे.
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या कॅ. अमरिंदर सिंग यांच्या साथीने भाजप मतदारांना “डबल इंजिन’ची आशा दाखवत आहे. 2017 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने 77 जागा मिळवून भाजप- अकाली दलाची 10 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली होती.
“आप’ला 20 तर भाजप-अकाली दल आघाडीला 18 जागा मिळाल्या होत्या. मुक्त आणि निष्पक्ष मतदान होण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.