बंगळूरु – राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये क शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला.
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्याच बंगळुरूमध्ये आज शिवजयंतीचे औचित्य साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करत शिवनामाचा गजर केला, अशी माहिती राष्ट्रवादीकडून ट्वीट करून देण्यात आली आहे.
देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आलीे. यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील आणि केंद्रातील मंत्र्यांनी देखील विविध ठिकाणी उपस्थित राहत कार्यक्रमांना हजेरी लावली.
डॉ. अमोल कोल्हे सध्या कर्नाटकमध्ये आहेत. महाराजांच्या बंगळुरूतील पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यापूर्वी त्यांनी होदीगेरे (कर्नाटक) येथील महापराक्रमी शहाजीराजेंच्या समाधीला भेट दिली. होदीगेरे (कर्नाटक) येथील महापराक्रमी शहाजीराजेंच्या समाधीला भेट देऊन नतमस्तक झालो. शहाजीराजे समाधी स्मारक समितीचे स्मारकाच्या उभारणीसाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मी देखील या स्मारकाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.
18 डिसेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे घडली होती. बंगळुरू येथे घडलेल्या या प्रकाराचे पडसाद राज्यभर उमटले होते. बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेने शिवप्रेमी चांगलेच संतापले आणि आक्रमक झाले होते. या घटनेनंतर संतापलेल्या शिवप्रेमींनी बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात एकत्र येत आंदोलन केलं होतं.