लाहोर – पाकिस्तानमध्ये पब्जी खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने या खेळाच्या नादात आपल्या संपूर्ण कुटुंबालाच संपवून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाहोरच्या पोलिसांनी शुक्रवारी या घटनेची माहिती दिली आहे. लाहोरमधील 45 वर्षीय नाहिद मुबारक या आरोग्य कर्मचारी गेल्या आठवड्यात आपल्या घरातच मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या समवेत त्यांचा 22 वर्षांचा मुलगा तैमूर आणि 17 आणि 11 वर्षांच्या मुलीही घरातच मृतावस्थेत आढळल्या होत्या.
मुबारक यांचा किशोरवयीन मुलगा मात्र सुरक्षित आढळला होता. त्यानेच आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली असल्याचे तपासामध्ये आढळून आले होते. हा किशोरवयीन मुलगा पब्जी खेळाच्या पूर्ण आहारी गेला होता. त्याने या खेळाच्या ओघामध्ये आपल्या आईची आणि भावंडांची हत्या केली होती. दररोज दीर्घकाळ ऑनलाईन पब्जी खेळत राहिल्यामुळे या मुलाच्या मानसिक अवस्थेवर परिणाम झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
नाहिद या घटस्फोटित होत्या आणि सतत आपल्या मुलाला अभ्यास न करण्याबद्दल आणि सतत पब्जी खेळण्याबद्दल बोलत असत. शुक्रवारीही त्या आपल्या मुलाला ओरडल्या. त्यानंतर त्यांच्या मुलाने आईचे पिस्तुल कपाटातून काढले आणि आई आणि भावंडांची हत्या केली. यावेळी भावंडे झोपेतच होती.