नवी दिल्ली: सध्या पॅरिसमध्ये फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सची (एफएटीएफ) बैठक सुरू आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनांना लगाम घालण्याच्या दृष्टीने पाकिस्तान प्रचंड दबावाखाली आला आहे, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी म्हटले.
दहशतवादविरोधी पथकांच्या (एटीएस) प्रमुखांची येथे बैठक झाली. त्या बैठकीत डोवाल बोलत होते. दहशतवादासाठी पुरवल्या जाणाऱ्या निधीला आळा घालण्यात अपयश आल्याने पाकिस्तानला एफएटीएफने ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे.
आता पाकिस्तानला काळ्या यादीत टाकायचे की नाही ते चालू बैठकीत ठरू शकते. त्यामुळे पाकिस्तानवर विविध निर्बंध येण्याची टांगती तलवार लटकत आहे. त्याचा संदर्भ डोवाल यांनी दिला.
पाकिस्तानकडून राष्ट्रीय धोरणाचे साधन म्हणून दहशतवादाचा वापर केला जातो, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली. कुठल्याही देशाला युद्ध परवडणारे नाही. युद्धामुळे मोठा आर्थिक भार येतो. त्याशिवाय, जीवितहानी विचारात घेतली तर मोठे मानवी मूल्यही मोजावे लागू शकते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुणीच विजयाची खात्री देऊ शकत नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.