चीनच्या सापळ्यात अडकला पाकिस्तान; कर्जासाठी मान्य करतोय धोकादायक अटी

इस्लामाबाद, दि. 9- पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्ज योजनेसाठी सहा महिन्यात डझनभर अटी-शर्तींची पूर्तता केली. मात्र भीकेचे डोहाळे लागलेल्या पाकिस्तानची सर्व मदार चीनवर आहे. चीनकडून पाकिस्तानला 11 अब्ज अमेरिकी डॉलरचे सहाय्य अपेक्षित आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या 6 अब्ज डॉलरच्या मदतीसाठी पाकिस्तान जे म्हणेल ते करण्यासाठी तयार असल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तान सरकार ऑक्‍टोबरपर्यंत वीजबिल 5.65 रुपये प्रति युनीट किंवा 36 टक्के वाढ करण्यास तयार आहे. पाकिस्तानात वीज ग्राहकांवर 2023 पर्यंत एकूण 884 अब्ज रुपयांचा बोजा पडणार आहे. इतकेच नाही तर पाकिस्तान 600 अब्ज रुपयांच्या जवळपास नवे कर लावणार आहे. या अटी त्या 11 अटींपैकी आहेत, ज्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायच्या आहेत. तरच पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळणार आहे. असे असलं तरी पाकिस्तान सर्वाधिक चीनवरच अवलंबून आहे.
पाकिस्तानने पैशांसाठी केवळ चीनकडेच हात पसरलेत असे नाही. पाकिस्तानने चीनसह आजूबाजूच्या देशांकडेही हात पसरले आहेत. चीनकडून 10.8 अब्ज डॉलरच्या मदतीसह, पाकने यूएईकडून दोन अब्ज डॉलर, जागतिक बॅंकेकडून 2.8 अब्ज डॉलर, जी-20 कडून 1.8 अब्ज डॉलर, आशियाई विकास बॅंकेकडून 1.1 अब्ज डॉलर आणि इस्लामिक डेव्हलपमेंट बॅंकेकडून 1 अब्ज डॉलरची मदत मागितली आहे.
पाकिस्तान हे चीनचे ग्राहक बनले आहे. पाकिस्तान सतत चीनकडे हात पसरत राहतो. चलन बदली कार्यक्रमांतर्गत चीनने पाकिस्तानची कर्ज मर्यादा 3 अब्ज डॉलरवरुन वाढवून 4.5 अब्ज डॉलर इतकी केली आहे. एकप्रकारे आपल्या देशाचा डोलारा सांभाळण्यासाठी पाकिस्तानचे चीनवरचे अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत चालले असून चीनच्या कर्जाचा पाश अधिक घट्ट होत चालला आहे. या स्थितीतून वर यायला आता पाकिस्तानात एखादा मोठा चमत्कारच होण्याची आवश्‍यकता असल्याचे जाणकारांचे भाष्य आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.