देशवासीयांचा जीव धोक्‍यात घालून लस निर्यात करणे योग्य आहे का?, राहूल गांधींचा मोदींना सवाल

नवी दिल्ली – देशवासीयांचा जीव धोक्‍यात घालून अन्य देशांना करोनाची लस निर्यात करणे योग्य आहे काय, असा प्रश्‍न कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. करोनाच्या काळात देशभरात लसीचा तुटवडा निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. असे असताना या गंभीर काळात लसीकरणाच्या नावाने उत्सव कसले साजरे करता, असा सवालही त्यांनी मोदींना विचारला आहे.

मोदींनी देशात तीन दिवस लसीकरण उत्सव साजरा करण्याची घोषणा काल केली आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. देशात करोना मोठ्या प्रमाणात फैलावत असताना मोदी सरकारने कोणताही भेदभाव न करता सर्वच राज्यांना पुरेशा प्रमाणात लस पुरवठा केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

या महामारीच्या विरोधात आपण सर्वांनीच एकत्रितपणे लढा दिला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारांकडून लसीची मागणी वाढत आहे पण केंद्राकडून पुरेशी लस दिली जात नसल्याची ओरड सध्या सुरू आहे. देशात आता वयोमर्यादेची कोणतीही अट न घालता सरसकट सर्वांनाच ही लस मिळाली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसने या आधीच केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून लसीची निर्यात बंद करून देशात सरसकट सर्वांचेच लसीकरण वेगाने करा, अशी मागणी केली आहे. लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर फोटो लावण्याऐवजी सरसकट सर्वांनाच लसीकरण करणे ही तातडीची आणि काळाची गरज आहे. कारण लसीकरणाच्या अभावाने करोनाचा आणखी विस्फोट झाला तर देशाच्या अर्थकारणावर त्याचे दूरगामी विपरीत परिणाम होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.