इस्लामाबाद – करोनाची साथ पुन्हा वाढायला लागल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील विधानसभेच्या निवडणुकांच घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुका 25 जुलैला होणार आहेत. या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली जात होती. मात्र, तरीही या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.
या विधानसभेतील 45 आमदारांच्या निवडीसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यातील 33 आमदार पाक व्याप्त काश्मीरमधील आणि 12 आमदार काश्मिरी निर्वासितांमधून निवडले जाणार आहेत. पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त न्या (नि.) अब्दुल रशीद सुलेहरिया यांनी पाक व्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमधील पत्रकार परिषदेमध्ये या निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर केले.
21 जूनपर्यंत उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील. तर उमेदवारांची अंतिम यादी 3 जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. या निवडणुकीत एकूण चार मतदारसंघ वाढवण्यात आले आहेत, असे सुलेहरिया यांनी सांगितले. या निवडणुकीत एकूण 28 लाख मतदार मतदान करणार आहेत.
यापूर्वी करोनाची साथ पुन्हा वाढायला लागल्याने पीओके मधील निवडणूक दोन महिन्यांकरिता तहकूब करण्याचे आवाहन नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने केले होते. मात्र, सर्व विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला होता.
गेल्यावर्षी पाकिस्तानने गिलगीट बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेतल्या होत्या. मात्र, लष्करी जोरावर बळकावलेल्या या प्रदेशामध्ये केलेला कोणत्याही बदलाला कायदेशीर आधार नसल्याची टीका भारताने केली होती. संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसह गिलगीट बाल्टिस्तानचा सर्व भाग हा भारताचाच भाग असल्याचे भारताने यापूर्वीच पाकिस्तानला सांगितले आहे.