कोलकाता – राष्ट्रीय पुरस्कार विजेते, बंगाली चित्रपट निर्माता बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना वृद्धापकाळातील आजारांनी घेरले होते.
त्यांच्या 5 चित्रपटांना बेस्ट फीचर फिल्म अंतर्गत नॅशनल ऍवार्ड मिळाले आहेत. तसेच 2 चित्रपटांसाठी त्यांना बेस्ट डायरेक्टर म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बुद्धदेव दासगुप्ता यांनी आपल्या करियरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली होती. यानंतर त्यांनी फिल्ममेकिंग क्षेत्रात पुढे जायचे निश्चित केले. बुद्धदेव दासगुप्ता यांनी 1968 साली 10 मिनिटांच्या एका डॉक्युमेंट्रीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते. त्यांचा पहिला-वहिला सिनेमा “दुरात्वा’ 1978 साली प्रदिर्शत झाला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ट्विट केले आहे. प्रख्यात चित्रपट निर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंब, सहकारी आणि प्रशंसकांना सहानुभूती असल्याचे ममतांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
बुद्धदेव दासगुप्ता हे एक कवी सुद्धा होते. त्यांना कविता लिहिण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी लिहिलेल्या कविता फक्त भारतातच नाही तर परदेशातसुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. बुद्धदेव दासगुप्ता यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत. ज्यात कोफिन किम्बा सूटकेस, हिमजोग, श्रेष्ठ कबिता, भोमबोलर आश्चर्य कहानी यासुद्धा समाविष्ट आहेत.