इंग्लंडचे खेळाडू भारतासमोर लोटांगण घालतात

माजी कसोटीपटू फारुख इंजिनिअर यांची जळजळीत टीका...

मुंबई  – वर्णद्वेषी टीका केल्या प्रकरणी इंग्लंडचा क्रिकेटपटू ओली रॉबिन्सनवर इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने केलेली कारवाई मागे घ्यावी असे आवाहन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले होते. त्यावर आगपाखड करताना भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी जळजळीत टीका केली आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंकडे कोणाकडेही नितिमत्ता उरलेली नाही. वर्णद्वेषासारख्या गंभीर प्रकरणात एखाद्या खेळाडूवर कारवाई झाली आहे व त्यांचे पंतप्रधानच त्याच्यासाठी आवाहन करत आहेत हेच अत्यंत संतापजनक आहे. भारतीय खेळाडू तसेच भारताबाबत पराकोटीचा द्वेष करायचा व आयपीएल स्पर्धेत मिळत असलेल्या पैशांसाठी भारतासमोरच लोटांगण घायालचे हीच त्यांची स्वार्थी वृत्ती आहे, अशा शब्दात इंजिनिअर यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना तसेच त्यांच्या क्रिकेट मंडळाला झोडपले आहे.

काही वर्षांपूर्वी केलेल्या वर्णद्वेषी ट्‌विटमुळे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनला त्यांच्या मंडळाने निलंबित केल्याने वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रॉबिन्सनचे निलंबन चुकीचे होते, असे सांगितले. याच विधानाचा समाचार इंजिनियर यांनी घेतना खेदही व्यक्‍त केला आहे.

मी वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान जॉन्सन यांचे मत वाचले. पंतप्रधानांनी अशा घटनेवर मत व्यक्त करणेच मुळात चूक आहे. इंग्लंड मंडळाने त्याला निलंबित करून योग्य कारवाई केली आहे. त्याने खूपच संतापजनक चूक केली असून त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर खेळाडूंसाठी हे एक उदाहरणच ठरेल, असेही ते म्हणाले.

इंजिनियर बऱ्याच वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनाही वर्णद्वेषाचे बरेच अनुभव आले आहेत. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असताना वर्णद्वेषाचा सामना कसा केला याचाही उलगडा त्यांनी केला. 1960च्या दशकाच्या ते लॅंकेशायरकडून काऊंटी क्रिकेट खेळले.

जेव्हा मी इथे काऊंटी क्रिकेट खेळायला आलो तेव्हा लोक माझ्याकडे भारतातून आलेला व्यक्ती म्हणून वेगळ्या नजरेने पाहायचे. मला लक्ष्य केले गेले कारण मी भारतातून आलो होतो. माझे इंग्रजी त्यांच्यापेक्षा चांगले आहे. त्यांनी जेव्हा जेव्हा माझ्यावर वर्णद्वेषी टीका केली तेव्हा त्यांना जशास तसे उत्तर दिले. एवढेच नव्हे, तर मी माझ्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणामुळे स्वत: ला सिद्ध केले. मी देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम केले आणि याचा मला अभिमान आहे. मात्र, आजच्या काळातही त्यांचे खेळाडू असे भाष्य करत असतील तर कठोर कारवाई झालीच पाहीजे. त्यांच्या खेळाडूंकडे केवळ स्वार्थ आहे. बीसीसीआयने जेव्हापासून आयपीएल स्पर्धा सुरू केली तेव्हा केवळ पैसा मिळतो म्हणून त्यांचे खेळाडू लोटांगण घालत असल्याचे संपूर्ण जगाने पाहीले आहे.

पैशांसाठी स्वाभीमानही गमावला…

आयपीएल सुरू झाल्यापासून इंग्लंडचे खेळाडू भारतीयांबाबत तोल संभाळून बोलताना दिसले. केवळ बक्‍कळ पैसा मिळतो म्हणून त्यांनी बीसीसीआयसमोर तसेच भारतासमोर लोटांगण घालणे सुरू केले आहे. भारतात मालिका खेळली किंवा आयपीएल स्पर्धेत खेळाडूंना संधी मिळाली तर अन्य मालिकांपेक्षा प्रचंड पैसा मिळतो. त्यामुळे प्रसंगी आपला स्वाभीमानही ते गहाण टाकताना अनेकांनी पाहिले आहे, अशी खरमरीत टीकाही इंजिनिअर यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.