पाकिस्तानने ‘गझनवी’ क्षेपणास्त्राची केली चाचणी

लाहोर : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण असताना आता पाकिस्तानने आज सकाळी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र गझनवीची चाचणी केली. 290 किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले आहे. गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा हेतू असू शकतो.

कराची जवळील सोनमीयानी परिक्षण केंद्रावरून या क्षेपणास्त्रांचे परिक्षण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही देशाकडून पाठिंबा न मिळाल्याने पाकने अगोदरच बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची धमकी दिली होती. दरम्यान, या क्षेपणास्त्र चाचणीसाठी पाकिस्तानने कराची शहरातील हवाई क्षेत्राचा काही भाग 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने या चाचणीआधी नोटॅम जारी केला होता. पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. नोटॅमच्या नोटीसमध्ये आंतरराष्ट्रीय विमानांना कराची हवाई हद्दीतील तीन मार्गांवरुन विमान वाहतूक टाळण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यायी मार्गही सुचवण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.