पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पिंपरी – पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केली. ही घटना रावेत येथे बुधवारी (दि. 28) सकाळी उघडकीस आली. वृषाली गणेश लाटे (वय 40, रा. आदित्य टेरेस, शिंदे वस्ती, रावेत), असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती गणेश ऊर्फ संजू चंद्रकांत लाटे (वय 45) यांनीही आत्महत्या केली.

बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश यांनी आपल्या पत्नीच्या डोक्‍यात हातोडी मारून त्यांचा खून केला. त्यानंतर छताच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांच्या भावाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

लाटे दांपत्याला मूलबाळ नाही. गणेश हे टेक महिंद्रा या कंपनीत कामाला होते. गेल्या काही दिवसांपासून पत्नी वृषाली मानसिक दृष्ट्या आजारी होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या आजापणात आणखीनच वाढ झाली. आजारपणामुळे त्यांना होणाऱ्या यातना सहन न झाल्याने त्यांचा खून करून आपण आत्महत्या करीत असल्याचे गणेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

“आय विल बी डान्सिंग विथ यू गाइज’

आत्महत्या करण्यापूर्वी गणेश लाटे यांनी भावुक करणारे पत्र लिहिले. त्यात त्यांनी लिहिले आहे की, “वृषालीची सध्याची अवस्था मला पाहवत नाही. माझे तिच्यावर अतोनात प्रेम आहे. माझ्या शिवाय ती जगू शकणार नाही, यामुळे अत्यंत जड मनाने मी माझी आणि तिची जीवनयात्रा संपवत आहे. काही चुकले असल्यास क्षमस्व.

कृपया सोसायटीतील गणेशोत्सवाचा एकही कार्यक्रम रद्द न करता साजरा करावा. या घटनेचा काहीही परिणाम होऊ देऊ नका. हीच माझी अंतिम इच्छा समजा. “आय विल बी डान्सिंग विथ यू गाइज’. या घटनेला कोणीही जबाबदार नाही. दोन्ही कुटुंबांनी या गोष्टींवर भांडू नका. आम्हाला शांतीने निरोप द्यावा हीच अखेरची इच्छा…’

Leave A Reply

Your email address will not be published.