पाकने मसूद अझहरला तुरूंगातून गुपचूप सोडले   

नवी दिल्ली – जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहरला संयुक्‍त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानने देखील त्याच्यावर कारवाई केली होती. परंतु, भारतात अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानने मसूद अजहरची गुपचूप तुरूंगातून सुटका केल्याची माहिती गुप्तचर संघटनेने केंद्र सरकारला दिली आहे.

गुप्तचर संघटनेच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्याने याविरोधात सियालकोट-जम्मू आणि राजस्थानमध्ये येणाऱ्या काळात पाकिस्तान दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. याचाच एक भाग म्हणून राजस्थान सीमेजवळ अतिरिक्त पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात येत आहेत. यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी सरकारला अॅलर्ट केलं आहे. तसंच भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी पाकिस्ताननं मसूद अजहरची तुरुंगातून सुटका केली आहे, अशी माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल आणि जवानांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या संभाव्य कारवायांबाबत सतर्कही केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.