इस्लामाबाद – पाकिस्तानात इम्रान खान यांच्या सरकारविरोधात 11 पक्षांच्या आघाडीने अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारला असून सर्व लोकप्रतिनिधींनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांना फेरनिवडणूका घेणे भाग पडावे, यासाठी विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय “पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’च्या इस्लामाबादेत झालेल्या आपत्कालिन बैठकीमध्ये घेण्यात आला.
सामूहिक राजीनामे देण्याच्या निर्णयावर आघाडीच्या सर्व घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याचे या आघाडीचे प्रमुख मौलाना फजलूर रेहमान यांनी मंगळवारी रात्री पत्रकारांना सांगितले. “सर्व खासदार आपापले राजीनामे 31 डिसेंबर रोजी आपल्या पक्षांच्या अध्यक्षांकडे सादर करतील.’ असे त्यांनी सांगितले आणि “पीएमएल-एन’नेत्या मरियम नवाझ आणि “पीपीपी’नेते बिलावल भुट्टो यांचे कौतुकही केले.
सर्व लोकप्रतिनिधींनी नक्की कोणत्यावेळी राजीनामे देऊन इम्रान खान यांच्याविरोधात आंदोलन करायचे याचा निर्णय नंतर घेतला जाईल, असेही रेहमान यांनी सांगितले. मात्र पाकिस्तानमधील इतर राज्यांप्रमाणे सिंध प्रांतातील “पीपीपी’ सरकारने मात्र विरोधकांना साथ देऊन राजीनामा देण्याला विरोध दर्शवला आहे.
2018 मध्ये झालेल्या निवडणूकांनंतर लगेचच या निवडणूकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करून मौलाना फजलूर रेहमान यांनी सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांना संसद सदस्यत्वाची शपथ न घेण्याचे आवाहन केले होते.
मात्र त्यांची ही कल्पना “पीपीपी’ आणि “पीएमएल-एन’पक्षाच्या नेत्यांनी स्वीकारली नव्हती. विरोधकांची 13 डिसेंबरला सरकारच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी लाहोरला रॅली काढली जाणार आहे.