नवी दिल्ली – सध्या देशात तीन कंपन्यांच्या करोना प्रतिबंधक लसी नियामक प्राधिकरणाकडे तपासणीसाठी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने यापुढील काळात देशभर लसीकरणासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यानुसार देशभर 28 हजार 947 कोल्ड चेन पॉईंटसची (Cold Chain System) सुविधा उभारण्यात आली असून सुमारे 85 हजार 643 उपकरणे लस साठवण्यासाठी वापरली जाणार आहेत.
पहिल्या टपप्यात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करणारे (फ्रंटलाईन वर्कर्स) अशा तीन कोटी नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. देशातील प्राधान्यक्रमानुसार 30 कोटी नागरिकांनी ही लस देण्याचे नियोजन असून त्यासाठी अतिरिक्त वॅक्सिनेटर्स आणि लसीच्या पुरवठ्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच वापर यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
पहिल्या टप्प्यातील लसीकरण ( Covid Vaccines ) लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. कोल्ड स्टोरेजची अतिरिक्त सुविधा तसेच अन्य उपकरणांचा पुरवठा राज्यांना 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
लसीकरणाची प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या सुलभ व्हावी यासाठी राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचा गट (नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अडमिनिस्ट्रेश फॉर कोविड-19 – एनईजीव्हीएसी) स्थापन करण्यात आला असून या गटाने प्राधान्यक्रमाने कोणत्या नागरिकांना लस द्यायची हे निश्चित केले आहे.
पहिल्या तीस कोटी नागरिकांमध्ये आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचारी आणि पन्नास वर्षावरील आजारी, व्याधीग्रस्त नागरिकांचा समावेश आहे. या लसीकरण मोहिमेत प्रत्येक भारतीयाला लस मिळणार असून सगळ्यात मोठी अशी ही लसीकरणाची मोहिम एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालेल.