Pakistan Imran Khan : तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज पुन्हा अटक करण्यात आली. गेल्या वर्षी ९ मे रोजी रावळपिंडीतील लष्कराच्या मुक्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खान यांना अटक करण्यात आली आहे. सायफर गैरव्यवहार प्रकरणी इम्रान खान यांच्या सुटकेचे आदेश दिले गेल्यानंतर लगेचच इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे.
सायफर आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना रावळपिंडीतील दहशतवाद विरोधी न्यायालयाने ९ मे रोजीच्या दंगल प्रकरणी आज समन्स बजावले होते. मात्र इम्रान खान यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अदियाला तुरुंगातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित करण्यात आले होते.
रावळपिंडी लष्कर मुख्यालयावरील हल्ल्याप्रकरणी इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आणि इम्रान खान यांच्या पोलीस कोठडीची मागणीही केली. मात्र न्यायालयाने कोठडीची ही मागणी फेटाळून लावली. इम्रान खान यांच्या चौकशीसाठी पोलिसांनी अदियाला तुरुंगात जावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.
सायफर गैरव्यवहार प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली. या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इम्रान खान यांना जामीनही मंजूर केला. जर इम्रान खान यांना अन्य कोणत्याच प्रकरणात कोठडीची आवश्यकता नसेल, तर त्यांची सुटका करण्यात यावी, असे म्हटले होते. मात्र सुटकेच्या आदेशांपाठोपाठच ९ मे रोजीच्या दंगल प्रकरणी त्यांना पुन्हा अटक केली गेली.