“भारत हल्ला करेल या भीतीने पाक लष्कर प्रमुखांनी शेवटी गुडघे टेकले”

पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचा खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सतत काही ना काही खटके उडत असतात त्यातच आता भारताचा पाकिस्तानवर किती दरारा आहे हे दर्शविणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये खुलासा करताना भारतीय फायटर प्लेनचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्यासंदर्भातील प्रकरणावर भाष्य केले. यामध्ये त्यांनी भारत आपल्यावर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकत अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा केला आहे. ख्वाजा यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानच्या संसदेमध्ये माजी परराष्ट्र मंत्र्यांनी भारताबद्दल पाकिस्तानी लष्करामध्ये आणि सरकारमध्ये असणाऱ्या भीतीसंदर्भात भाष्य केले. भारत हल्ला करेल या भीतीने अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. भारताचे समाधान व्हावे आणि प्रकरण आणखीन वाढू नये या भीतीमुळे पाकिस्तानेने अभिनंदन यांना सोडल्याचा दावा माजी परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे.

तर पाकिस्तानी संसदेचे माजी स्पीकर असणाऱ्या अयाज सादिक यांनी, “त्यावेळी भारत आपल्यावर हल्ला तर करणार नाही ना अशी भीती पाकिस्तानला वाटत होती. भारत पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय लटपटत होते आणि चेहरा घामाने भिजला होता. बाजवा यांना भारत हल्ला करेल अशी भीती होती,” असा खुलासा केला आहे.

“परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी हे थरथरत होते. अभिनंदनसंदर्भात बोलताना त्यांनी खुदाचा वास्ता देत (देवाचं नाव घेत) त्याची सुटका करण्याची मागणी केली. पाकिस्तानला भीती होती की जर फायटर प्लेन पायलट असणाऱ्या अभिनंदनला सोडले नाही तर रात्री नऊ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करेल,” असेही अयाज सादिक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.